स्त्रियांची कामेच्छा पुरुषांपेक्षा कमी असते की अधिक?

0
1646

स्त्रियांना पुरुषांपेक्षा लैंगिक इच्छा जास्त असते का? किंवा कमी असते का ? हा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्या वेबसाईटवर देखील हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे. तथापिने मागच्या आठवड्यात अंबाजोगाई येथील एका महाविद्यालयात लैंगिकता या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती तेव्हा देखील हा प्रश्न विचारला होता. स्त्रियांच्या लैंगिक भावनांविषयी अनेक समज- गैरसमज, तर्क-वितर्क आपल्याला दिसून येतात. र. धों. कर्वे यांचा स्त्री-पुरुषांच्या लैंगिक भावनांतील भेद याविषयीचा लेख वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

स्त्री-पुरुषांच्या लैंगिक भावनांतील भेद
स्त्रियांची कामेच्छा पुरुषांपेक्षा कमी असते की अधिक? स्त्रियांना पुरुषांहून आठपट काम असतो, हे खरे काय? की स्त्रियांचा काम पुरुषांहून निराळ्या प्रकारचा असतो?

स्त्रियांच्या कामवासनेसंबंधी अनेकांनी अनेक प्रकारचे तर्कवितर्क केलेले आहेत आणि त्यांचा एकमेकांशी मुळीच मेळ बसत नाही. एका टोकाला असे म्हणणारे लोक आहेत, की स्त्रियांना मुळी कामेच्छाच नसते; त्यांना फक्त अपत्याची इच्छा असते. आणि दुसऱ्या टोकाचे लोक म्हणतात, की स्त्रियांना पुरुषांच्या आठपट काम असतो; त्यांची कामेच्छा अनावर असते, वगैरे. यामुळे हे एक मोठे गूढच वाटते. स्त्रिया या बाबतीत खरे बोलणे जवळजवळ अशक्य आहे. तेव्हा जो तो स्वतःचा तर्क लढवतो यात नवल नाही.

देवता कि कामिनी?
फार प्राचीन काळापासून स्त्रियांसंबंधी दोन प्रकारच्या भावना प्रामुख्याने दिसतात. त्या पुरुषांपेक्षा उच्च असून त्यांच्यात काहीतरी अद्भुत शक्ती असते ही एक भावना आणि स्त्री म्हणजे मूर्तिमंत कामवासना ही दुसरी. प्रजोत्पादनाचे कार्य पवित्र समजून ते घडवून आणणाऱ्या इंद्रियांची पूजा करण्याची जोपर्यंत प्रवृत्ती होती, तोपर्यंत या दोन भावनांत विसंगती नव्हती. परंतु कालांतराने वैराग्यवृत्तीचा प्रसार होऊन कामवासना निंद्य समजण्यात आली आणि मग मात्र या दोन भावनांत तीव्र विरोध दिसू लागला.

कौमार्याला महत्व आले आणि शारीरिक सुखे निकृष्ट आहेत असे लोक निदान तोंडाने तरी म्हणू लागले. ही तापसी वृत्ती विशेषतः पुरुषांतच दिसे आणि ज्यांना खरोखर इंद्रीपदमन करता आले. त्यांची स्त्रीयांना उच्च समजण्यास हरकत नव्हती. परंतु ज्यांना कामवासनेशी व्यर्थ झगडावे लागले, ते मात्र स्त्रीला मूर्तिमंत कामवासनाच समजू लागले. म्हणजे स्त्रियांविषयी मत शास्त्रीय निरीक्षणाने बनण्याऐवजी वैयक्तिक मनःप्रवृत्तीमुळे बनले आणि अजून हीच स्थिती कायम आहे.

स्त्रीपुरुषांतील मतभेद : स्त्रियांत वैयक्तिक फरक पुरुषांपेक्षाही जास्त असतो; यामुळे स्त्रियांना कामवासना पुरुषांपेक्षा जास्त किंवा कमी असते असे सरसकट विधान करता येणार नाही. व्यक्तिशः ती अत्यंत मंद किंवा अत्यंत प्रबल असू शकेल.या बाबतीत स्त्रीपुरुषांत सामान्यतः जे भेद दिसतात ते असे:

समागमाची सवय झाल्यावर ती अधिक तीव्र होते.
सामान्यतः स्त्रीची कामवासना अपोआप जागरूक होत नही, ती कोणीतरी जागरूक करावी लागते.
अतिरेक सहन करण्याची शक्ती स्त्रियांना पुरुषांपेक्षा पुष्कळच जास्त असते.

स्त्रियांच्या शरीराचा अधिक भाग संवेदनशील असतो.
स्त्रीची कामेच्छा ऋतुकालाचे (मासिक पाळी) मानाने बरीच कमीजास्त होते, तितकी पुरुषांची बदलत नाही.
स्त्रियांची कामपूर्ती अधिक सावकाश होते व त्यांचे समाधान अधिक वेळ टिकते.

उद्दीपनाच्या एका विशिष्ट पायरीनंतर शेवटपर्यंत पोचण्याची पुरुषांना जशी जरुरी भासते, तशी व तितकी स्त्रियांना भासत नाही. केवळ बाह्यरतीनेही त्यांना बरेच समाधान मिळते. तेव्हा त्यांना मनोनिग्रह जास्त असतो असे समजण्याचे कारण नाही.
एकंदरीत स्त्रियांची कामेच्छा पुरुषांपेक्षा कमी किंवा जास्त असते असे म्हणण्याऐवजी ती वेगळ्या प्रकारची असते, असे म्हणणे अधिक बरोबर होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here